पेट्रोलप्रमाणेच भाज्या खरेदीसाठीही झुंबड, रातोरात भाज्यांचे दर गगनाला; गृहिणी वैतागल्या

केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रक चालकांनी ट्रक वाहतूक बंद ठेवून सरकारच्या कायद्याचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातही या संपाचा मोठा परिणाम जाणवत आहे. महाराष्ट्रातीलसर्वच जिल्ह्यात ट्रक वाहतूक बंद आहे.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक झालीच नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचं बजेट कोलमडलं असून त्या वैतागल्या आहेत. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. अनेक भागात हे चित्र पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. आज भाजीपाल्यांच्या ट्रक मार्केटमध्ये आल्याच नाहीत. ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याला फटका बसला आहे.

त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एपीएमसी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दादरमध्ये भाजी मार्केट बंद

दादरच्या भाजी मार्केटमध्येही आज भाजीपाल्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे भाजीविक्रेते वैतागले असून त्यांनी आज भाजी विक्रीची दुकानेच बंद ठेवली आहेत. नेहमीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात भाजीपाला पुरवठा झाल्याचं या दुकानदारांचं म्हणणं आहे. दादरचं अत्यंत महत्त्वाचं भाजी मार्केट बंद राहिल्याने सकाळीच भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्यांच्या पदरी निराशा आली आहे. तसेच या भागातील भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली आहे.

नाशिकमध्ये रातोरात भाजीपाला महागला

नाशिकमध्येही ट्रकचालकाच्या संपाचा मोठा फटका बसला आहे. या संपाचा परिणाम नाशिकच्या बाजारांमध्ये देखील बघायला मिळत आहे. ट्रकचालकांच्या संपामुळे रातोरात भाज्यांचे दर हे जवळपास 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढल्याचे चित्र बाजारांमध्ये बघायला मिळते आहे.

नाशिकमध्ये भाज्यांचे दर काल – आज प्रती किलो

वाटाणे- 35- 70

मिरची – 40 – 60

गाजर – 40 – 60

कोथिंबीर – 20- 50

वांगे – 60- 100

भेंडी – 50- 70

टमाटे – 25 – 40

पुण्यात मार्केटयार्डात आवक कमी

पुण्यातही ट्रकचालकांच्या संपाचा मोठा फटका बसला आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केटयार्डमधील आवक कमी झाली आहे. नेहमीपेक्षा आज 10 ते 20 टक्के गाड्या मार्केटमध्ये कमी आल्या आहेत. आज फक्त 900 गाड्यांची आवक झाली आहे. दररोज साधारण 1100 ते 1200 वाहनांची आवक कमी झाली आहे.

अमरावतीत 30 टक्के घट

ट्रक चालकांच्या संपाचा अमरावतीच्या भाजीपाला बाजार पेठेवरही मोठा परिणाम झाला आहे. दररोज होणाऱ्या भाजीपाला मालाच्या तुलनेत आज भाजीपाल्याची आवक 30 टक्यांनी घटली आहे.

बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला बाजारपेठेत आला नसल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दररोज अमरावती बाजारपेठेत 35 ते 40 ट्रकमधून भाजीपाला आणला जातो. आज मात्र आठ ते दहा ट्रक आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सोलापुरात परिणाम नाही

दरम्यान, सोलापूरमध्ये या संपाचा काहीच परिणाम झाला नाही. वाहन चालकांच्या संपाचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाहतुकीवर परिणाम झाला नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये कांदा आला असला तरी तो बाहेर पाठवण्यासाठी मात्र अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील वाहन चालकांनी संप पुकारला आहे. मात्र या संपाचा कोणताही परिणाम भाजीपाला तसेच कांद्याच्या लिलावावर झालेला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याचे लिलाव सुरळीतपणे पार पडले असून कांद्याचे लिलाव देखील सुरळीतपणे पार पडणार आहेत

कल्याणमध्ये जैसे थे परिस्थिती

कल्याण एपीएमसी मार्केटमध्येही संपाचा परिणाम झालेला नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, कांद्यासह इतर आवक सुरळीत होती. उद्या या संपात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणारे जिल्ह्यातील ट्रक चालक संपात सहभागी झाले तर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment