Drone Didi Yojana : ‘महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर ८५% अनुदान, सरकार प्रशिक्षणही देणार’

Government Scheme : कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान आणण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. याद्वारे आता महिला सक्षमीकरणाला अधिक चालना दिली जातं आहे.

केंद्राच्या विकास भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून भटिंडा जिल्ह्यातील जज्जल आणि संडोहा गावांमध्ये जाहीर सभांना संबोधित करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत म्हणाले की, कृषी रसायनांची फवारणी आणि बियाणे पेरण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास खर्च कमी होईल.

यावेळी ते म्हणाले की, नवीन युगाचे तंत्रज्ञान पंजाबमध्ये जमिनीवरील रासायनिक भार कमी करून आणखी एका हरित क्रांतीचा मार्ग मोकळा करेल. नॅनो खताच्या वापराला प्रोत्साहन देणे हा देशाच्या कृषी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते भूजलाचे प्रदूषण रोखते आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जवळजवळ दूर करते.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून महिला बचत गटांना (एसएचजी) कृषी ड्रोनवर ८५ टक्के अनुदान मिळेल. महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. यामुळे शेतीतील महिलांचे योगदान वाढेल.

काय आहे ड्रोन दीदी योजना?
कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नुकतीच ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. महिलांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांना खते आणि कीटकनाशके फवारणीसाठी शेतकऱ्यांना मदत करता येणार आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना १५ हजार ड्रोनचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची कृषी क्षेत्रात प्रगती होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा अंदाज आहे. कृषी उद्देशांसाठी ड्रोन भाड्याने घेऊन, महिला शेतकरी वार्षिक १ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात, असंही शेखावत म्हणाले.

Leave a Comment